काही दिवसांपुर्वीच लाडक्या बाप्पाचं आगमन ढोल ताशाच्या गजरात मोठ्या जल्लोषात करण्यात आलं. भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थी तिथीला गणेश चतुर्थीचा सण साजरा केला जातो. बाप्पासोबत काढलेले दहा दिवस हे प्रत्येकासाठी आंनदमय असतात सर्वत्र प्रसन्न वातावरण असतं तसेच मनोभावे प्रत्येक जण लाडक्या बाप्पाची आराधना करतं होत. घरोघरी, मंडळांमध्ये बाप्पाची स्थापना करण्यात आली होती.
घरात तसेच मंडळात सकाळ संध्याकाळ आरतीचे आवाज घुमू लागत होत. सुखाचे हे 10 दिवस कधी सरून गेले काही कळलं देखील नाही आणि आता वेळ आली ती बाप्पाला निरोप देण्याची. मनात नसताना देखील बाप्पाला आज निरोप द्यावा लागणार आहे, हा दिवस लहान मुलांसोबत मोठ्यांसाठी देखील भावूक करणारा असतो. 10 दिवस मनोभावे बाप्पाची सेवा केल्यानंतर अखेर बाप्पाला निरोप देण्याचा दिवस येतो तो नकोसा वाटतो.
भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चर्तुदशी तिथीला अनंत चर्तुदशी साजरी केली जाते. दहा दिवसांच्या या भक्तीमय उत्साहानंतर गणपतीचे मोठ्या उत्साहात विसर्जन केले जाते. जितक्या गाजावाजात बाप्पाचे आगमन होते तितक्याच भावनिक मनाने बाप्पाला निरोप द्यावा लागतो. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या या नाम घोषात बाप्पाला आज निरोप दिला जाईल.
अशाच उत्साहात पुढच्या वर्षी लाडक्या बाप्पाचे आगमन करण्यासाठी पुन्हा त्या 10 दिवसांची वाट पाहिली जाईल. अखेर बाप्पाकडे हेच बोललं जाईल की, निरोप घेतो आता देवा आज्ञा असावी, चुकले आमचे काही त्याची क्षमा असावी... असे बोलतं बाप्पाला निरोप देण्यात येणार आहे.